रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल
“सातारा हिल मॅरेथॉनमुळे वाहतुकीत बदल – पोलीस प्रशासनाचे आवाहन“
दि. 14 सप्टेंबर रोजी सातारा शहरात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे.
स्पर्धेचा मार्ग
स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून होणार असून त्यानंतर खालील मार्गाने स्पर्धा पार पडेल:
पोवई नाका → मरिआई कॉम्प्लेक्स → शाहू चौक → अदालत वाडा → समर्थ मंदिर बोगदा → यवतेश्वर → प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पुढे ५०० मीटरवर वळण → पुन्हा समर्थ मंदिर → अदालत वाडा → नगरपालिका → शाहू चौक → मरिआई कॉम्प्लेक्स → पोवई नाका → पोलीस परेड ग्राउंड.
या मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशामक दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग
वाहतुकीसाठी खालील पर्याय उपलब्ध असतील:
- शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गाने येणारी वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी. कदम मार्केट – राधिका सिग्नल मार्गे शहरात प्रवेश करतील.
- बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून येणारी वाहने जिल्हा परिषद चौक, कनिष्क हॉल चौक, रिमांड होम मार्ग, जुना आर.टी.ओ. चौक किंवा बांधकाम भवन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुथा चौक मार्गे शहरात प्रवेश करतील.
- मुख्य बसस्थानक, राधिका सिग्नल व तहसील कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने शहराबाहेर जाऊ शकतील.
- सज्जनगड, ठोसेघर व परळी बाजूकडून येणारी वाहने शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे प्रवेश करतील.
- कास बाजूकडून येणारी वाहने मॅरेथॉन संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजूकडून शहरात येणार नाहीत; ती एकीव फाटा, मोळेश्वर, कुसुंबीमुरा, कुसुंबी व मेढा मार्गे शहरात प्रवेश करतील.
पार्किंग व्यवस्था
स्पर्धेकरीता येणाऱ्या स्पर्धक व नागरिकांनी खालील ठिकाणी आपली वाहने पार्क करावी:
- प्रशासन इमारतीसमोरील मोकळ्या मैदानात
- जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद ग्राउंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर
- जुना आर.टी.ओ. चौक ते वाढे फाटा जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस
- निर्मला कॉन्वेंट विद्यालय व सदर बाजार परिसरातील रस्त्याच्या एका बाजूस
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी वाहतुकीस सहकार्य करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
